Rjnews27marathi
शिरूर : गुणवत्ता, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मोठे यश संपादन करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण मांडवगण फराटा येथील चिमुकली अनुष्का फराटे हिने दाखवून दिले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवगण फराटा येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या अनुष्काने मंथन, डायमंड व NSSE या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत शिरूर-हवेलीचे आमदार पै. माऊली आबा कटके यांनी स्वतः तिचा सत्कार करून रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले.
मांडवगण फराटा येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त आमदार पै. माऊली आबा कटके उपस्थित असताना एका कार्यकर्त्याने अनुष्काच्या यशाची माहिती आबांना दिली. ही माहिती समजताच आबांनी तत्काळ अनुष्काला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्या गुणवत्तेचे कौतुक करत तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“तुला पुढील शिक्षणासाठी कोणतीही मदत लागली तर मला थेट फोन कर,” असे सांगत आबांनी चिमुकलीशी आत्मीयतेने संवाद साधला. आमदारांच्या या प्रोत्साहनामुळे अनुष्का आणि तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ही कृती उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरली.
अनुष्काच्या यशामुळे मांडवगण फराटा गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयात स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत तिने गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
यावेळी गावचे आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष पै. हनुमंत आण्णा फराटे, मांडवगण फराटा सोसायटीचे माजी चेअरमन श्री संतोष पाटील फराटे, श्री वीरेंद्र काका शेलार, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर नाना फराटे, वाघेश्वर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री संतोष नाना फराटे ईनामदार, माजी उपसरपंच श्री अमोल दादा शितोळे, श्री मुकेश साठे, श्री निलेश शितोळे, श्री संदीप जगदाळे तसेच पै. माऊली आप्पा फराटे आदी मान्यवर उपस्थित होते.




