विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव :
“शिक्षक म्हणजे कर्तव्याचा अखंड जाज्वल्य दीप,” असे गौरवोद्गार व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते स्वरूप गिरमकर यांनी सध्याच्या शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासोबतच विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षक अक्षरशः झिजत असल्याचे वास्तव आज ग्रामीण भागात प्रकर्षाने जाणवत आहे.
सध्या शिक्षकांवर जनगणना, SIR काम, BLO सर्वेक्षण, परीक्षा नियोजन, निकाल प्रक्रिया, शाळेतील अध्यापन आणि विविध प्रशासकीय कामांचा मोठा भार पडला आहे. एकीकडे कडक उन्हात गावोगावी फिरून नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक जीवाचे रान करत आहेत.
४३ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानात दिवसभर सर्वेक्षण करून रात्री उशिरापर्यंत शालेय कामे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांची धावपळ दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही अनेक शिक्षक कोणतीही तक्रार न करता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निष्ठेने कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे.
समाजामध्ये “शिक्षकांना भरपूर सुट्ट्या असतात”, “काम कमी आणि पगार जास्त” अशा टीका केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात शिक्षकांना शिक्षणासोबतच प्रशासनाची अनेक महत्त्वाची कामे पार पाडावी लागत असल्याने त्यांच्यावर मानसिक व शारीरिक ताण वाढत आहे.
विद्यार्थ्यांना संस्कार, शिक्षण आणि जीवनाची दिशा देणारा शिक्षक आज राष्ट्रकार्यातही तितक्याच जबाबदारीने योगदान देताना दिसत आहे. मतदान यादी अद्ययावत ठेवण्यापासून ते शासकीय योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
याबाबत बोलताना स्वरूप गिरमकर म्हणाले की, “आजचा शिक्षक हा केवळ वर्गातील गुरु राहिलेला नाही, तर तो समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ बनला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याला समाजाने योग्य तो सन्मान दिला पाहिजे.”
राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत शांतपणे, निस्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या या अविरत सेवेला समाजानेही मनापासून सलाम करण्याची गरज व्यक्त होत आहे.




