मंचर (आंबेगाव) | प्रतिनिधी – मयुरी चासकर
धामरी गावच्या मातीतून घडलेला जिद्दीचा हिरा अजित सदाशिव डफळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घालत आपल्या कर्तृत्वाची उज्ज्वल छाप उमटवली आहे. अत्यंत संघर्षमय जीवनप्रवासातून उभारी घेत त्यांनी मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या आयुष्यात संकटांचे डोंगर उभे राहिले होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अनेकांनी हार मानली असती, मात्र अजित डफळ यांनी खचून न जाता जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर शिक्षणाची कास धरली. दिवस-रात्र अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात करत अखेर PSI पद मिळवले.
अत्यंत मर्यादित साधनसंपत्ती असतानाही त्यांनी कधीही परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवला. त्यांच्या या प्रवासात आलेल्या प्रत्येक अडचणीला त्यांनी संधी मानत स्वतःला अधिक सक्षम बनवले. त्यामुळेच आज त्यांचे यश हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
अजित डफळ यांच्या यशामुळे धामरी गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही,” हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक तरुण दिशाहीन होत असताना अजित डफळ यांची यशोगाथा ही संघर्षातून यश मिळवण्याचा प्रेरणादायी मार्ग दाखवणारी ठरली आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे गावाचे नाव उंचावले असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी ते एक आदर्श बनले आहेत.
💐 अजित सदाशिव डफळ यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐




