व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरवाढीचा मोठा फटका; मे महिन्यात पुन्हा वाढीची शक्यता, बुकिंग नियमांमध्येही बदल होणार?

एप्रिल 2026 मध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योगांवर आर्थिक ताण वाढला आहे. कोलकात्यात सर्वाधिक 218 रुपयांची वाढ झाली असून चेन्नईत 203 रुपये, तर मुंबईत 196 रुपये आणि दिल्लीत 195.5 रुपयांनी दर वाढले आहेत. सध्या मुंबईत 19 किलो सिलिंडरची किंमत 2031 रुपये इतकी झाली आहे.
याउलट, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात एप्रिल महिन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील महिन्यात 60 रुपयांची वाढ झाल्यानंतर सध्या मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत 912.5 रुपये इतकी स्थिर आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागणी आणि पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात रिफायनरी उत्पादन वाढविणे, शहरी भागात गॅस बुकिंग अंतर 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढविणे, तर ग्रामीण भागात ते 45 दिवसांपर्यंत नेण्यात आले आहे. याशिवाय विविध क्षेत्रांना प्राधान्याने एलपीजी पुरवठा केला जात आहे.
मे महिन्यापासून एलपीजी बुकिंग नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याचे 25 दिवसांचे बुकिंग अंतर बदलले जाऊ शकते, तसेच OTP आधारित डिलिव्हरी प्रणाली कायमस्वरूपी लागू करण्याचा विचार सुरू आहे. eKYC प्रक्रियेलाही अधिक सक्ती करण्यात येऊ शकते.
दरम्यान, जागतिक स्तरावरील तणावाचा परिणाम भारतातील ऊर्जा बाजारावरही होताना दिसत आहे. विशेषतः पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भारताची आयात-आधारित ऊर्जा व्यवस्थेवरील अवलंबित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सरकारने मात्र देशात घरगुती एलपीजी, PNG आणि CNG चा पुरेसा पुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. एचपीसीएलने 1 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान देशभरात 335 लाखांहून अधिक एलपीजी सिलिंडर वितरित केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये स्थलांतरित कामगार व लघुउद्योगांसाठी 5 किलो आणि 2 किलो सिलिंडरचाही समावेश आहे.
दरम्यान, मार्च ते एप्रिल 2026 दरम्यान 19 किलो सिलिंडरच्या दरात तीन वेळा वाढ करण्यात आली. 1 मार्च रोजी 28 ते 31 रुपयांची वाढ, त्यानंतर 7 मार्च रोजी 114.5 रुपयांची मोठी वाढ आणि एप्रिलमध्ये पुन्हा 196 ते 218 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
भारतातील एलपीजी दर ठरविण्याचे काम इंडियन ऑइल (Indane), भारत पेट्रोलियम (Bharat Gas) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HP Gas) या कंपन्यांकडून केले जाते. जागतिक परिस्थितीमुळे या कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्याचा काही भार ग्राहकांवर टाकला जात आहे.
मे महिना जवळ येत असताना एलपीजी दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः व्यावसायिक सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *