वडगाव रासाईत महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन; ग्रामीण अर्थचक्राला बळ देण्याचा निर्धार

वार्ताहर – अल्लाउद्दीन अलवी 
वडगाव रासाई (ता. शिरूर, जि. पुणे) – ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परमपूज्य सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या शुभहस्ते उद्घाटन पार पडले, तर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती (पंचायत समिती दौंड) सयाजी ताकवणे होते. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन दत्तात्रय गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत पतसंस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमास स्थानिक सरपंच सचिन शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे व दीपक पाटील भोसले, ह.भ.प. अविनाश महाराज साळुंखे, माजी संचालक लतिकाताई जगताप, गोविंद तात्या फराटे, उद्योजक काकासाहेब खळदकर, प्रसाद गावडे, काशिनाथ काळे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल भदागरे यांनी संस्थेची प्रगती अधोरेखित करत सांगितले की, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत संस्थेच्या तब्बल १७ शाखा कार्यरत असून एकूण ठेवींचा आकडा ३१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून काटेकोर कर्जवसुली धोरणामुळे थकबाकी अत्यल्प पातळीवर राखण्यात यश आले आहे. संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थापक चेअरमन दत्तात्रय गावडे यांनी आपल्या भाषणात ठाम शब्दांत सांगितले की, “विश्वास हीच आमची भांडवलशक्ती आहे. सभासदांनी कष्टाने जमवलेल्या ठेवींचे संरक्षण आणि वेळेवर परतावा देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही.”
परमपूज्य गोरखे गुरुजी यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही संस्थेचा विकास अखंडित राहील, असा आशावाद व्यक्त केला. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, या शाखेमुळे वडगाव रासाई परिसरातील आर्थिक घडामोडींना चालना मिळून शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना कर्जसुविधा सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठ अधिक सक्षम होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले, तर बाळाप्पा राहींज (माजी संचालक, श्रीगोंदा कारखाना) यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्यामुळे वडगाव रासाई परिसरात आर्थिक विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *