“घोडधरण साखळाई उपसा योजनेवर शिरूरमध्ये संतापाचा स्फोट; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, न्यायालयीन लढाईचा इशारा”

अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी
ता. शिरूर — श्रीगोंदा व शिरूर तालुक्यांसाठी जीवनदायिनी ठरणारे घोडधरण आज वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, प्रस्तावित साखळाई उपसा सिंचन योजनेविरोधात शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या योजनेमुळे स्थानिक पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी न मिळता अन्य भागांकडे वळवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
सुमारे ११०० कोटी रुपयांची साखळाई उपसा सिंचन योजना या भागावर लादली जात असल्याची भावना व्यक्त होत असून, घोडधरणामुळे आधीच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या असताना त्याचा लाभ स्थानिकांना मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन टीएमसी क्षमतेची तळी विविध गावांमध्ये उभारण्यात आली आहेत. ही तळी भरताना धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यास शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांसाठी किती पाणी उरेल, याबाबत गंभीर शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, काही माध्यमांमध्ये ही योजना शिरूर तालुक्यासाठी लाभदायक असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्षात पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी न देता इतर भागांकडे वळवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर कुरुळी, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, तांदळी, इनामगाव, पिंपळसुट्टी, शिरसगाव काटा आदी गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत “घोडधरण बचाव शेतकरी समिती”ची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून साखळाई उपसा सिंचन योजनेला विरोध अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
इनामगाव येथे आयोजित तीव्र निषेध सभेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी श्रीनिवास घाडगे, दिलीप मोकाशी, नरेंद्र माने, बाळासाहेब खळदकर, फत्तेसिंग वाबळे, संजय घाडगे, शरद गद्रे, नितीन फलके, विजय मोकाशी, प्रफुल्ल घाडगे, महेश घाडगे, संदीप कापरे, रामभाऊ काळे, तात्यासाहेब घाडगे, तुकाराम मचाले, अमित फलके, इंद्रजीत वाळूंज, किरण शितोळे, बापूराव चव्हाण, विष्णुपंत वाबळे, हनुमंत तांबे आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
समितीचे प्रतिनिधी श्रीनिवास तात्या घाडगे यांनी राज्यकर्त्यांनी घोडधरणावर लादलेल्या साखळाई योजनेला कडाडून विरोध दर्शवला. तर शेतकरी नेते बाळासाहेब घाडगे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत, “ही योजना रद्द झाली नाही तर न्यायालयीन लढाई लढण्यासही आम्ही तयार आहोत,” असे सांगितले.
शेतकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, धरणात पाणी उपलब्ध असतानाही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जात नाहीत आणि स्थानिकांना पाणी दिले जात नाही. याशिवाय, दोन्ही तालुक्यांचे आजी-माजी आमदार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
सभेच्या शेवटी “घोडधरण वाचवा, शेतकरी वाचवा”च्या घोषणा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. उपस्थितांचे आभार तात्यासाहेब घाडगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *