आधी जीवनदाहिनी, आता मृतप्राय
नदीच्या पात्रात घाणीचे साम्राज्य, तेलकामठी येथे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांमध्ये भीती
उपसंपादक नागपूर
नागपूर: कळमेश्वर तालुक्यातील
तेलकामठी येथून वाहणारी नदी सध्या पूर्णपणे घाणीच्या विळख्यात अडकली असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. एकेकाळी गावासाठी जीवनदायी ठरलेली ही नदी आज घाण, कचरा, सांडपाणी आणि मलमूत्रामुळे अक्षरशः मृतप्राय झाली आहे. परिणामी, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तेलकामठी गावाची भौगोलिक रचना अशी आहे की, या नदीमुळे गावाचे दोन भाग पडले आहेत. दोन्ही भागांतील नागरिकांचा दैनंदिन संपर्क या नदीच्या परिसरावर अवलंबून आहे. पूर्वी या नदीत बाराही महिने स्वच्छ पाणी वाहत असल्याने शेती, जनावरांचे पाणी, तसेच घरगुती वापरासाठी ही नदी अत्यंत उपयुक्त ठरत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून झालेल्या दुर्लक्षामुळे आज नदीची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि मोठमोठी झाडे वाढल्याने
तेलकामठी येथील नदीची अशी दुरवस्था झाली आहे.
नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णतः अडथळला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून डबके तयार झाले असून या साचलेल्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढली असून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया,
टायफॉइड फोफावण्याची शक्यता आहे. तसेच दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग, अॅलर्जी, डोळ्यांचे संसर्ग आणि श्वसनासंबंधी त्रासही भविष्यात निर्माण होऊ शकतो. असे जाणकारांचे मत आहे. यासारख्या आजार
सांडपाणी नदीपात्रात
गावातील कचरा, सांडपाणी आणि मलमूत्र सर्रास नदीपात्रात टाकले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नदीकाठावर राहणाऱ्या काही नागरिकांकडून संडास व बाथरूमचे पाणी थेट नदीत सोडले जात आहे. परिणामी, संपूर्ण नदी दूषित झाली असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळ या भागात राहणाऱ्या नागरिकांना श्वास घेणेही कठीण होत असल्याची परिस्थिती आहे.
पर्यावरणाचा प्रश्न
नदी परिसरात वाढलेल्या घाणीमुळे केवळ आरोग्याचा नव्हे तर पर्यावरणाचा ही प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने जलजीव नष्ट होत आहेत.
याचा विपरीत परिणाम जनावरांवर ही पडू शकतो. शाळकरी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिसरातून जाताना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.





