मांडवगण फराटा येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम
प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी | मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे
मराठा समाजाचा बुलंद आवाज, अन्यायाविरुद्ध लढणारे संघर्षयोद्धा आणि समाजहितासाठी अहोरात्र झटणारे सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक विधायक उपक्रम मांडवगण फराटा येथे राबविण्यात आला.
घडगे तळई येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मा. श्री. प्रल्हाद आगे पाटील यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही, पुस्तकं, पेन यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची गरज आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास माजी सरपंच शिवाजी आण्णा कदम, अनिलजी घाडगे, माऊली आप्पा फराटे, डॉ. महेश जाधव, डॉ. मनोज शेलार, नवनाथ घाडगे, अध्यक्ष मनोज फराटे, नवनाथ फराटे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
यावेळी बोलताना माजी सरपंच शिवाजी आण्णा कदम यांनी सांगितले की, “मनोज जरांगे पाटील यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी आहे. मराठा समाजासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचा आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणवाढीचा उपक्रम राबविण्यात आला हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”
कार्यक्रमाची संपूर्ण मांडणी प्रेरणादायी होती. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप हे एक सामाजिक भान जपणारे पाऊल ठरले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्यास यथोचित सलाम केला.




