सामाजिक भान जपत वाढदिवसाचा अनोखा साज! बाभुळसर बुद्रुकमध्ये कु. आरोही नेते हिचा वाढदिवस कीर्तन, अन्नदान आणि सद्भावनेच्या भावनेत साजरा
अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी | बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे
बाबांनी दिलेला शब्द म्हणजे एक वचन... आणि त्या वचनात जर श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी असेल, तर तो एक उत्सव बनतो!

बाभुळसर बुद्रुक येथील रामदास नेते यांच्या लाडक्या नाती कु. आरोही हिचा वाढदिवस यंदा केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता, समाजाच्या सहभागातून, धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात, समाजहिताच्या कार्यात रूपांतरित झाला. कीर्तन, अन्नदान, मार्गदर्शन आणि समाजप्रबोधनाच्या संगमातून घडलेला हा सोहळा अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेला.
कीर्तन सेवा आणि सुसंस्कारांची शिदोरी
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते ह.भ.प. सौ. राणीताई काळे महाराज यांचे हृदयस्पर्शी कीर्तन. महाराजांनी समाजातील आजही काही ठिकाणी जाणवणाऱ्या मुलगा-मुलगी भेदभावावर, अत्यंत संवेदनशीलतेने प्रकाश टाकला. “वंशाचा दिवा” या जुनाट संकल्पनेवर त्यांनी जोरदार प्रहार करत, मुलींच्या सक्षमीकरणाची गरज भूतकाळाच्या सावलीतून समाजासमोर मांडली.
या भावनिक कीर्तनाने उपस्थित प्रत्येकाच्या अंत:करणाला साद घातली. अनेक महिलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, आणि उपस्थितांनी एकमताने स्वीकारले – मुलगीसुद्धा घराचा, वंशाचा दिवा असू शकते!
श्रावण सोमवारचा योग – अन्नदानाचे पुण्यकार्य
या पवित्र कार्यक्रमास श्रावण सोमवारचा योग लाभला आणि त्यामुळे या वाढदिवसाच्या दिवशी अन्नदानाचे महान कार्य घडले. लहान मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदान करणे ही भावना नेते कुटुंबाच्या संस्कृतीची आणि माणुसकीची जाणीव अधोरेखित करणारी होती.
शेकडो लोकांना गरम गरम अन्नाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम संपेपर्यंत नेत्यांनी स्वतः अन्नग्रहण न करता, सर्व वारकऱ्यांची, ज्येष्ठांची व महिलांची सेवा करत राहिले. ही त्यांची सेवावृत्ती – एक प्रेरणा ठरली.
नेते कुटुंबाचा सामाजिक वाटा – एक आदर्श
नेते कुटुंबीय हे केवळ एका मुलीचा वाढदिवस साजरा करत नव्हते, ते सामाजिक बांधिलकीचं भान जपत समाजासाठी एक आदर्श निर्माण करत होते. त्यांच्या पुढाकाराने यापूर्वीही गावात सप्ताह, अन्नदान, मंदिर उभारणी, शाळा विकास असे कित्येक उपक्रम राबवले गेले आहेत.
त्यांच्या दिंडी व्यवस्थापनातील अनुभव आणि सेवा यामुळे ‘जय हनुमान प्रसादिक दिंडी’ हे गावात एक नावाजलेले नाव बनले आहे. वारकऱ्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांना मदत करणं, नियोजन शिस्तबद्ध करणं – या सगळ्याची जबाबदारी नेत्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आरोहीसाठी समाजाकडून शुभेच्छा
आरोही या चिमुकल्या चिमणीच्या आयुष्यातील या पहिल्याच वाढदिवसाने समाजात एक वेगळी उमेद, एक वेगळी दिशा निर्माण केली आहे. ती मोठी झाल्यावरही तिच्या घरच्यांनी घालून दिलेला हा मार्ग, ती समाजासाठी आदर्श बनेल अशी आशा निर्माण करतो.
नेते कुटुंबीयांचे समाजासाठी असलेले योगदान, सेवाभाव आणि श्रद्धा यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार.
लेखक:
ह.भ.प. संजय (आप्पा) नागवडे, म्हसोबावाडी
रामकृष्ण हरी!




