एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून तुकडोजी विद्यालयातील २०० विद्यार्थ्यांना वृक्षवाटप

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून तुकडोजी विद्यालयातील २०० विद्यार्थ्यांना वृक्षवाटप

 

वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांनी रोपांच्या संगोपनाची घेतली जबाबदारी

 

विजय कांबळे – प्रतिनिधी

 

नागरगाव : शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या भावनेतून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच भावनेतून योगेश्वरी हेल्थ फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यामंदिर, दौंड येथे इयत्ता पाचवीतील तब्बल २०० विद्यार्थ्यांना चिकू व आंब्याची रोपे वाटप करण्यात आली.

 

योगेश्वरी हेल्थ फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी व त्यांच्या टीमने विद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रूपाली मॅडम, आरती मॅडम व स्वप्निल सर यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रत्येक विद्यार्थ्याला चिकू व आंब्याचे रोप देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

 

यावेळी जे. पी. क्लासेसचे श्री. प्रल्हाद जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय तसेच सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. केवळ वृक्षलागवड करून थांबण्यापेक्षा लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रोपांना योग्य वेळी पाणी देणे, झाडाभोवती स्वच्छता राखणे, त्याचे संरक्षण करणे आणि वाढीच्या काळात आवश्यक ती निगा राखणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

‘रोप लावणे ही सुरुवात; त्याचे संगोपन ही खरी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ताब्यातील रोपाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे रोपाचे संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक होऊ शकते, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

 

कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. सुभाष डावरे सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षक श्री. श्रीकांत कुलकर्णी सर तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रशांत चांदेकर सर उपस्थित होते.

 

इयत्ता पाचवीच्या तिन्ही वर्गांच्या वर्गशिक्षिका सौ. मयुरी काटे, सौ. मेघा चव्हाण व सौ. सुप्रिया उर्शिळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची योग्य पद्धत, रोपांची निगा आणि संगोपन याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या ताब्यात एक रोपटे देण्यात आले.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली असून, वृक्षांशी भावनिक नाते जोडण्याचा सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. ‘एक पेड माँ के नाम’ या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या रोपट्याचे जतन करून ते मोठे करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन सौ. यामिनी हरहरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *