नगरमोरी चौकात २७ वर्षीय तरुणीला भावासमोरून कारमध्ये जबरदस्तीने नेल्याचा आरोप; चौघांविरोधात दौंड पोलिसांत गुन्हा

दौंडमध्ये तरुणीला भावासमोरून कारमध्ये डांबून नेल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

दौंड | प्रतिनिधी : रमेश बनसोडे 

दौंड तालुक्यातील नगरमोरी चौकात २७ वर्षीय तरुणीला तिच्या भावासमोर जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बहिणीला वाचविण्यासाठी धावलेल्या भावाला मारहाण झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दीपक मारुती मांढरे (वय ४३) आणि संतोष विठ्ठल जाधव (वय ४०, दोघेही रा. गिरीम, ता. दौंड) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

फिर्यादी आणि त्यांची २७ वर्षीय बहीण पुण्याहून एसटी बसने नगरमोरी चौकात आले होते. घरी जाण्यासाठी नातेवाईकाची वाट पाहत असताना लाल रंगाची ब्रेझा कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. कारमधून काही व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्यांनी फिर्यादीसोबत वाद घालत त्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

यानंतर संबंधितांनी तरुणीला पकडून तिच्या इच्छेविरुद्ध कारमध्ये बसविल्याचा आरोप आहे. प्रसंगावधान राखत भावाने बहिणीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रतिकार निष्फळ ठरला आणि कार वेगाने घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

 

घटनेनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून तरुणीचा विविध ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र तिच्याबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

 

दौंड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरुणीला नेण्यामागील नेमके कारण, ती सध्या कुठे आहे आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

 

घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि तरुणीचा ठावठिकाणा तपासानंतरच स्पष्ट होणार असून, या प्रकरणाकडे दौंड परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *