पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला उजाळा; स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत पुण्यतिथी उत्साहात

प्रतिनिधी – विजय कांबळे

नागरगाव : तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संचालक तथा विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका प्रियांका नांदखिले यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले. संस्थेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियांका नांदखिले यांनी केले.

यावेळी विद्यार्थिनी राधिका नैराळे हिने अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारत त्यांच्या जीवनकार्याची व व्यक्तिमत्त्वाची प्रभावीपणे माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच ओवी गणेश राक्षे, प्रांजल किरण ढमढेरे, सार्थक संदीप हिंगडे आणि गौरव सुहास पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी संस्थेचे संचालक महेश ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या उत्कृष्ट प्रशासक, कुशल संघटक आणि लोककल्याणकारी शासक होत्या. भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच विविध धार्मिक व सामाजिक स्थळांच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत ढमढेरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई विक्रम जाधव व आराध्या दिनेशकुमार सिंह यांनी केले. आभार प्रदर्शन सई विक्रम जाधव हिने केले.

याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंद ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे तसेच संचालक महेश ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *