पदाचा उपयोग समाजहितासाठी झाला पाहिजे; अशोक शहाणे यांचा साहित्यिक संस्थांच्या वतीने सन्मान
प्रतिनिधी – विवेकानंद फंड
शिक्रापूर : महाराष्ट्र राज्य सुवर्णकार संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी शिक्रापूर येथील प्रसिद्ध सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक शहाणे यांची निवड झाल्याबद्दल शिरूर तालुक्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, बालकुमार साहित्य संस्था आणि शिरूर तालुका साहित्यिक संघ यांच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहाणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, “मिळालेल्या पदाचा उपयोग समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यातील सुवर्णकार कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, त्यांच्या विविध समस्या व अडचणींना न्याय मिळावा तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सुवर्णकार संरक्षण समिती कार्यरत आहे. अशोक शहाणे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत समितीने त्यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे.
अशोक शहाणे हे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून, गरजू व गोरगरीब नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. तसेच शिरूर तालुक्यातील विविध साहित्यिक आणि सामाजिक संस्थांच्या उपक्रमांना शहाणे यांचे नेहमीच पाठबळ मिळत असल्याने साहित्यिक संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरूर ग्रामीण अध्यक्ष मयूर करंजे, बालकुमार साहित्य संस्थेचे संस्थापक प्रा. मनोहर परदेशी, बालकुमार साहित्य संस्था शिरूर तालुका अध्यक्ष राहुल चातुर, प्रमुख कार्यवाह विवेकानंद फंड, रमेश भुजबळ, संजीव मांढरे, लेखक विठ्ठल वळसे पाटील, तथागत मैत्री संघाचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम, मिलिंद परगणे, रवी झोडपे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. मनोहर परदेशी यांनी अशोक शहाणे हे गोरगरिबांच्या मदतीसाठी वेळेवर धावून जाणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या सामाजिक कार्याचा आपण जवळून अनुभव घेतला असल्याचेही परदेशी यांनी नमूद केले.
यावेळी मयूर करंजे, रमेश भुजबळ आणि राहुल चातुर यांनी आपल्या मनोगतातून अशोक शहाणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या नव्या जबाबदारीमुळे सुवर्णकार समाजातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना अशोक शहाणे यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेल्या पदाचा उपयोग केवळ समाजाच्या हितासाठी आणि गरजू नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी करणार असल्याचे सांगितले. तसेच साहित्यिक संस्था, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या सन्मान सोहळ्यामुळे सामाजिक कार्यासोबत साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राला सहकार्य करणाऱ्या अशोक शहाणे यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




