पिंपरी दुमाला जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी – विवेकानंद फंड
पिंपरी दुमाला : भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्वयंशिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेचे नियोजन अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, आत्मविश्वास आणि मेहनतीची सवय लावून घेतल्यास भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच यश मिळवता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले.
चाणक्य युवा परिवार, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर्स सर्च परीक्षा, भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच प्रसन्ना नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये राज्य व जिल्हास्तरावर उल्लेखनीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पिंपरी दुमाला जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. महेश पालकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अथर्व रतन चिखले, अथर्व आबा चिखले, यज्ञेश शंकर सोनवणे, कार्तिक विशाल खळदकर, पौर्णिमा अक्षय तक्ते, साईराज संदीप खळदकर, ईशान तुषार चिखले, उत्कर्ष प्रतिक डोळस, श्रेयश नवनाथ सोनवणे आणि आरुष महेश डोळस या विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पिंपरी दुमाला जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला राज्यस्तरावर दाद मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्या मोनिकाताई हरगुडे, मंत्रालयाचे उपसचिव प्रभाकर गावडे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील, जगदीश महामुनी, शोभाताई महामुनी, महेश वेदपाठक, प्रा. अंबादास केत, संजय वेदपाठक, पिंपरी दुमाला शालेय समितीचे अध्यक्ष शरद दुर्गे तसेच संयोजक अजिंक्य हिरवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक राहुल चातुर, तंत्रस्नेही शिक्षक कांताराम शिंदे, स्वयंसेविका शोभा डोळस आणि संध्या बांगर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य, परीक्षेची तयारी आणि मेहनतीमुळे हे यश मिळाले असून त्यांच्या यशात शिक्षक व पालकांचेही मोठे योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पिंपरी दुमाला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय परीक्षांमध्ये मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




