राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांचा विशेष सन्मान

शिक्रापूर दि. १२ (वार्ताहर) : विवेकानंद फंड 

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती आणि राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष दशरथ काळे पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी तसेच वाचकांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी ते सातत्याने विविध उपक्रम व नवनवीन संकल्पना राबवत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

शिक्रापूर येथील भैरवनाथ मोफत वाचनालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथपाल संतोष काळे पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. वाचनालयाच्या माध्यमातून विविध पुस्तके, उपक्रम आणि वाचनाभिमुख कार्यक्रमांच्या आयोजनातून त्यांनी वाचकांना ग्रंथालयाशी जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अविनाश दत्तात्रेय कदम आणि वाचनालयाचे सभासद अनिल जगताप यांच्या वतीने संतोष काळे पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना पुस्तकांचा संच भेट देऊन त्यांच्या ग्रंथालयीन कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी अविनाश कदम, अनिल जगताप, प्रशांत वाबळे, वाचनालयाचे सभासद, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे यांच्यासह ग्रामस्थ व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचनसंस्कृती जपण्यासाठी ग्रंथपालांचे योगदान महत्त्वाचे असून, संतोष काळे पाटील यांच्या कार्यामुळे शिक्रापूर परिसरातील वाचकांना ग्रंथालयाची अधिक जवळीक निर्माण होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *