आषाढी एकादशीनिमित्त बाभुळसर बुद्रुकमध्ये विठ्ठलभक्तीचा उत्सव; आरती, नामस्मरण व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर) : प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच श्री दत्त महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आरती, नामस्मरण आणि प्रसाद वितरणाचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

या धार्मिक कार्यक्रमात गावातील सांप्रदायिक व धार्मिक कार्यात सातत्याने सहभाग घेणारे ह.भ.प. सुभाष (नाना) धोंडिबा नागवडे तसेच प्रगतशील शेतकरी दिलीप भिमराव नागवडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी व दत्त महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, शेतीमालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळो, अशी मनोभावे प्रार्थना केली.

कार्यक्रमादरम्यान टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा अखंड जयघोष करण्यात आला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल… विठ्ठल…” अशा गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार भाविकांनी सामूहिक भजन, नामस्मरण आणि आरतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यानंतर नागवडे कुटुंबियांच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी खिचडी, केळी व फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. ग्रामस्थ, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे बाभुळसर बुद्रुक गावात भक्ती, सामाजिक ऐक्य आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थित भाविकांनी विठ्ठलाच्या नामस्मरणातून समाजात शांतता, बंधुभाव आणि सद्भावना कायम राहण्याची प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *