Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुरू असलेल्या मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR-2026) सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढीची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी १५ जुलै २०२६ पासून ग्रामपंचायत मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २४ जुलै २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, त्यानंतर हरकती व सूचना स्वीकारणे आणि ४ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते.
संबंधित तहसीलदारांना मतदार यादी डाउनलोड करून कंट्रोल चार्ट तयार करण्याचे तसेच २३ जुलैपर्यंत प्रारूप यादी तयार करून २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, विधानसभा मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणामुळे अनेक ठिकाणी ग्रामपंचायत मतदार यादीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत मतदार यादीच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनीही विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात यावा, अशी सूचना केली होती.
राज्य निवडणूक आयोगाने संगणक प्रणालीद्वारे डाउनलोड करण्यात आलेल्या अहवालांचा आढावा घेतला असता राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी मोजक्याच ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्याचे निदर्शनास आले.
या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी सध्या प्रसिद्ध करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच ग्रामपंचायत मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आणि पुढील सविस्तर सूचना स्वतंत्रपणे लवकरच जारी करण्यात येतील, असेही आयोगाने कळविले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला तात्पुरता विलंब होणार असला तरी विधानसभा मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण पूर्ण झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि निवडणूक यंत्रणेला सुधारित वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.




