प्रतिनिधी -अल्लाउद्दीन अलवी
दौंड, ता. २५ : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव येथील सुपुत्र तथा भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे यशस्वी विमा प्रतिनिधी शरद पवार यांना सलग दहाव्यांदा प्रतिष्ठेचा MDRT (Million Dollar Round Table – USA) बहुमान प्राप्त झाल्याने संपूर्ण दौंड तालुक्यासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विमा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची जागतिक पातळीवरील ही मानाची ओळख मानली जाते.
दि. १७ जुलै २०२६ रोजी पुणे येथील द सेंट्रल पार्क हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक निरंजन गोरे, विभागीय विपणन प्रबंधक ओमप्रकाश साहू आणि विभागीय विक्री प्रबंधक विवेक भारद्वाज यांच्या हस्ते शरद पवार यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यास जिल्ह्यातील विमा प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पॉलिसीधारक आणि निमंत्रितांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शरद पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात आयुर्विमा योजनांचे महत्त्व प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविले आहे. केवळ विमा विक्रीपुरते मर्यादित न राहता अनेक कुटुंबांना योग्य आर्थिक नियोजन, मुलांच्या शिक्षणासाठी निधी, भविष्यातील सुरक्षितता आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक लाभार्थ्यांना योग्य वेळी विम्याचा परतावा मिळून त्यांचे शिक्षण, करिअर आणि भविष्य सुरक्षित होण्यास मदत झाली आहे.
ग्रामीण भागात विमा जनजागृतीसाठी सातत्याने कार्य करत त्यांनी व्यवसायातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग दहा वेळा MDRT (USA) आणि दोन वेळा COT (Court of the Table – USA) ही दुर्मिळ कामगिरी करणारे ते या परिसरातील मोजक्या प्रतिनिधींमध्ये गणले जातात. यंदाच्या सन्मान सोहळ्यात वीस एलआयसी शाखांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश झाला.
याशिवाय शतकवीर, करोडपती विमा प्रतिनिधी, दौंड शाखेतील गॅलक्सी क्लब सदस्य तसेच ‘विमा ग्राम कानगाव’ या उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाबद्दलही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून कानगावसह संपूर्ण दौंड तालुक्याचा त्यांनी अभिमान उंचावला आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “माझ्या या यशामागे एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी विमा प्रतिनिधी, माझे कुटुंबीय आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व पॉलिसीधारक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या विश्वासामुळेच हा सलग दहाव्यांदा मिळालेला MDRT बहुमान शक्य झाला असून भविष्यातही समाजाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन.”
ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक साक्षरता, बचतीची सवय आणि आयुर्विमा संरक्षणाचे महत्त्व पटवून देत जागतिक दर्जाच्या कामगिरीपर्यंत पोहोचलेल्या शरद पवार यांच्या यशामुळे दौंड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.




