पिंपळसुटीतील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून १० लाखांची मदत; मनिषाताई कटके यांनी केली सांत्वनपर भेट

पिंपळसुटी (प्रतिनिधी): रमेश बनसोडे 

पिंपळसुटी येथील बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकली भाग्यश्री वारे हिच्या कुटुंबीयांची सौ. मनिषाताई ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.

या दुःखद प्रसंगी शासनाच्या वतीने मदतीचा हात म्हणून भाग्यश्री वारे यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश सौ. मनिषाताई कटके यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. अचानक ओढवलेल्या या दुःखातून कुटुंबीयांना सावरण्यासाठी शासनाकडून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मनिषाताई कटके यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, संबंधित विभागाच्या अधिकारी स्मिता राजहंसे, निळकंठ गव्हाणे, शिंदे, पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भाग्यश्री वारे हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

पिंपळसुटी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *