Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
पिंपरी दुमाला :
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या गोठ्यातून तीन शेळ्या चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत शेतकरी साहेबराव चिखले यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, २२ जुलै रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी साहेबराव चिखले यांच्या गोठ्यात प्रवेश करून तीन शेळ्या लंपास केल्या. विशेष म्हणजे, चोरी होण्यापूर्वी एक संशयित सुमो गाडी गावातील रस्त्यांवर वारंवार फिरताना काही नागरिकांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे या गाडीचा आणि चोरीच्या घटनेचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी या दिशेने तपास करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, याच रात्री पिंपरी दुमाल्यालगतच्या गणेगाव खालसा परिसरातही मोठ्या प्रमाणावर शेळ्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक रोड परिसरात काही घरांच्या खिडक्या तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणांहून कोंबड्या चोरीला गेल्याची माहितीही नागरिकांनी दिली आहे.
अल्पावधीतच तीन वेगवेगळ्या गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. रात्रीच्या वेळी चोरट्यांची वाढती हालचाल लक्षात घेता पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, संशयित वाहनांची तपासणी करावी आणि या घटनांतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व चोरीच्या घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील पशुधन हे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असल्याने अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.




