केडगावात जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; हॉकी स्टिक, कोयता व रॉडने मारहाण, एक आरोपी अटकेत

प्रतिनिधी – विकास साळुंके 

यवत (ता. दौंड) – केडगाव परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभुद्ध उर्फ विशाल नितीन अवधुते (वय 20, रा. पिसेवस्ती, केडगाव, ता. दौंड) हे 11 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास लालचंदनगर सोसायटीसमोरील ताज पान शॉप येथे मोटारसायकल (क्र. MH 42 AW 1841) घेऊन पान घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी अजय अनिल भोसले, सुजल अनिल भोसले (दोघे रा. केडगाव) व अर्जुन आसवरे (पूर्ण तपशील अपूर्ण) हे तेथे येऊन फिर्यादीस जुना वाद काढून शिवीगाळ व दमदाटी करू लागले.

यानंतर आरोपींनी लाकडी हॉकी स्टिक, कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर करून फिर्यादीवर बेछूट हल्ला केला. या हल्ल्यात अवधुते हे जखमी झाले असून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 574/2026 नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार भापकर (बकल नं. 2485) यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बालकृष्ण गाडेकर करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अजय अनिल भोसले यास 12 जून 2026 रोजी अटक करण्यात आली असून त्यास दौंड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता 17 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *