अल्लाउद्दीन अलवी प्रतिनिधी

शिरूर, ता. ५ : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा व इनामगाव परिसरात आलेल्या चक्रीवादळाने शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. आधीच पाण्याअभावी आणि विविध नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आणखी एक मोठे संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांसह सौर ऊर्जा संच, वीज व्यवस्था आणि शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.
इनामगाव येथील शेतकरी गणेश पवार यांच्या शेतातील पंपावर बसविण्यात आलेला सौर ऊर्जा संच प्रचंड वाऱ्यामुळे कोलमडून पडला. अनेक ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे केळी, आंबा, डाळिंब आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागांमधील फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वादळाचा तडाखा इतका भीषण होता की अनेक ठिकाणी वीज खांब आणि विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या, त्यामुळे
वीजपुरवठाही विस्कळीत झाला. आधीच चिंचणी घोड धरणातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर न होणे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे न भरणे आणि कालवा फाटा वेळेत न सोडल्याने या भागातील कांदा, ऊस, डाळिंब, सोयाबीन, हरभरा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
त्यातून सावरत असतानाच आलेल्या या चक्रीवादळाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. विहिरी व बोअरवरील सौर ऊर्जा संच कोसळल्याने सिंचन व्यवस्थेवरही परिणाम झाला असून आगामी हंगामाचे नियोजन धोक्यात आले आहे.
याबाबत शेतकरी तुकाराम मचाले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. “शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई जाहीर करावी. अन्यथा शेतकऱ्यांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल,” अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक शेतकऱ्यांनी कृषी, महसूल आणि वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
Rjnews27 Marathi विशेष
“एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे वादळाचा तडाखा... निसर्गाच्या दुहेरी संकटात सापडलेल्या इनामगावच्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या आधाराची गरज आहे. कष्टाने उभे केलेले पीक आणि सौर यंत्रणा काही मिनिटांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू दाटले आहेत.”




