“घोड धरणाच्या पाण्यावर गदा? साकळाई उपसा सिंचन योजना रद्द करण्यासाठी शिवसेनेचे आमदार कटके यांना निवेदन”

नागरगाव | विजय कांबळे, प्रतिनिधी
घोड धरणावरील मंजूर असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेमुळे शिरूर तालुक्यात भविष्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करत शिवसेनेच्या वतीने शिरूर-हवेलीचे आमदार माऊलीआबा कटके यांना निवेदन देऊन ही योजना तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीला परिसरातील शेतकरी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळाल्याने साकळाई योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
शासनाने चिंचणी येथील घोड धरणातून अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील काही गावांसाठी साकळाई उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिली असून त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. मात्र या योजनेला सुरुवातीपासूनच घोड धरणाच्या मूळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या मते, घोड धरणाचे पाणी हे प्रामुख्याने शिरूर तालुक्यातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे आहे. असे असताना स्थानिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ही योजना राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. घोड धरणाच्या मूळ लाभार्थ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणून ही योजना लादली जात असल्याची भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, साकळाई उपसा सिंचन योजनेची मूळ संकल्पना आणि मंजुरी ही अहिल्यानगर तालुक्यातील विसापूर धरणातून करण्यात आली होती. त्यामुळे ही योजना घोड धरणाऐवजी विसापूर धरणातूनच राबविण्यात यावी, अशी ठाम भूमिका शिवसेना आणि शेतकरी प्रतिनिधींनी मांडली आहे.
ही योजना सुरू झाल्यास घोड धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या वर्षभर पाणी उपलब्ध राहणाऱ्या भागातील शेतीला भविष्यात केवळ आठ महिन्यांपुरतेच पाणी मिळू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय रांजणगाव आणि कारेगाव औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, शिरूर नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना तसेच विविध ग्रामीण पिण्याच्या पाणी योजनांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यावरील संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी आमदार माऊलीआबा कटके यांनी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करून साकळाई उपसा सिंचन योजना रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच स्थानिक शेतकरी, नागरिक आणि उद्योगांच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी पार पाडावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिरूर नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. ईश्वराताई पाचर्णे, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, अनिल पवार, बाळासाहेब कचरे, योगेश ओवाळ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
“घोड धरणाच्या पाण्यावर कोणाचाही अन्याय होऊ देणार नाही. स्थानिक शेतकरी, नागरिक आणि उद्योगांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष कायम राहील,” अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *