जेजुरी | प्रतिनिधी शाम जगताप
कात्रज परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका विधीसंघर्षीत बालकावर भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ जून २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बारगे आणि अभिनय चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक विधीसंघर्षीत बालक कात्रज हायवेवरील त्रिमूर्ती गार्डनसमोरील झाशीची राणी भुयारी मार्गाजवळ संशयास्पदरीत्या थांबलेला आहे.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्रसाठा जप्त करून विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच अंदाजे १ हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित बालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून शस्त्र कोठून मिळाले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बारगे, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांचा धडाका सुरूच असून, नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




