मांडवगण फराटा, वार्ताहर :Rjnews27marathi
शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला ग्रामपंचायतीची २६ मे रोजी तहकूब झालेली ग्रामसभा मंगळवारी (दि. २ जून) चांगलीच वादळी ठरली. ग्रामपंचायतीच्या कारभारावर, विकासकामांवर, पाणीपुरवठा योजनेवर, स्वच्छतेवर तसेच विविध योजनांतील निधी खर्चावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार करत प्रशासनाला धारेवर धरले. अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
ग्रामसेविका सीमा दुर्गुडे-म्हस्के यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. त्यानंतर जमाखर्च मंजुरी, अ.ब.क.ड. नोंदींचे वाचन, वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त पत्रे, आलेले अर्ज, संभाव्य खर्चास मंजुरी, ‘माझा गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान, मनरेगा अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि कमी खर्च झालेली कामे रद्द करणे या विषयांवर चर्चा सुरू झाली.
सभेच्या प्रारंभी शासनाच्या उष्माघात प्रतिबंधक सूचनांचे वाचन करण्यात आले. दुपारी १२ ते ३ या वेळेत नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा, अशा सूचना शासनाने दिल्या असल्याचे सांगण्यात आले. यावर ग्रामस्थ निलेश कोंडे यांनी तीव्र आक्षेप घेत, “शासन नागरिकांना उन्हात बाहेर पडू नका असे सांगत असताना ग्रामसभा भर उन्हात का आयोजित करण्यात आली? नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का?” असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर प्रशासनाकडून ठोस उत्तर देण्यात आले नाही.
यानंतर सदस्य नामदेव निंबाळकर यांनी पाणीपुरवठा योजनेवर खर्च झालेल्या निधीचा मुद्दा उपस्थित करत ग्रामपंचायतीला कोंडीत पकडले. लाखो रुपयांचा खर्च दाखविण्यात आला असताना गावात पाणीपुरवठ्याची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयातच पाणी उपलब्ध नसताना योजना प्रत्यक्षात कुठे राबविण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच वृक्षारोपणासाठी खर्च दाखविण्यात आलेला निधी आणि प्रत्यक्षात झालेली कामे याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली.
आरोग्य विषयक चर्चा सुरू असताना एकही आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थ निलेश कोंडे यांनी संबंधित विभागाला ग्रामपंचायतीकडून माहिती देण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीत विजेअभावी मोटारसायकलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागल्याची घटना राज्यभर चर्चेत आली होती. मात्र आजही स्मशानभूमीत वीज सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी लावून धरला.
यावर सभेचे अध्यक्ष तथा प्रशासक तुकाराम निंबाळकर यांनी ग्रामपंचायतीकडे पुरेसा कर वसूल होत नसल्याने विकासकामे करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. मात्र निलेश कोंडे यांनी स्मशानभूमीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध असतो, त्याचे काय झाले, असा प्रतिप्रश्न उपस्थित करत प्रशासनाला अडचणीत आणले.
ग्रामस्थ संजीव भोसले यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील बंद पडलेली शौचालये, पाण्याचा अभाव आणि परिसरात साचलेला कचरा यावरून प्रशासनावर जोरदार टीका केली. ग्रामपंचायतीत सहा महिला सदस्य आणि ग्रामसेविका कार्यरत असतानाही कार्यालयातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता आल्या नाहीत, तर गावात स्वच्छतेचा संदेश कसा दिला जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रश्नांची सरबत्ती वाढत गेल्याने सभागृहातील वातावरण तापले. नामदेव निंबाळकर, निलेश कोंडे, संजीव भोसले, ज्ञानेश्वर गरुड, योगेश निंबाळकर, लालासो बुधे, भाऊ शेलार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विविध विकासकामांचा हिशेब मागितला. १५ वा वित्त आयोग निधी, वृक्षारोपणासाठी झालेला खर्च, बसस्थानकासाठी खर्च करण्यात आलेला निधी तसेच इतर विकासकामांची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
अखेर प्रश्नांच्या भडिमाराने आणि वाढत्या गदारोळामुळे सभेचे अध्यक्ष तथा प्रशासक तुकाराम निंबाळकर यांनी सभा अपूर्ण अवस्थेत सोडून निघून गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली. दरम्यान, ग्रामसेविका सीमा दुर्गुडे-म्हस्के यांनी ग्रामस्थांनी मागितलेली सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या ग्रामसभेस नामदेव निंबाळकर, निलेश कोंडे, संजीव भोसले, ज्ञानेश्वर गरुड, योगेश निंबाळकर, लालासो बुधे, भाऊ शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




