Rjnews27marathi
दौंड तालुक्यातील मळद आणि परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका मळद गावचे माजी सरपंच प्रदीप मुरलीधर साळवे यांच्या कुटुंबीयांना बसला. त्यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभासाठी उभारण्यात आलेला भव्य मंडप जोरदार वाऱ्यामुळे क्षणार्धात कोसळल्याची घटना घडली.
समारंभ सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल झाला. काही मिनिटांतच वाऱ्याचा वेग वाढला आणि त्यासोबत आलेल्या पावसामुळे मंडपाची रचना अस्थिर झाली. उपस्थितांना काही समजण्याच्या आतच संपूर्ण मंडप जमीनदोस्त झाला. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी एकच धावपळ उडाली.
मात्र प्रसंगावधान राखत उपस्थितांनी तातडीने सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे साखरपुडा समारंभात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मंडप कोसळल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले असून कार्यक्रमाचे नियोजन विस्कळीत झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.




