दौंड तालुक्यातील गुळ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १७.७९ लाखांचा गुळ व साखरेचा साठा जप्त

दौंड, प्रतिनिधी :विकास साळुंके 

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागीय कार्यालयाने विशेष मोहिमेअंतर्गत दौंड तालुक्यातील विविध गुळ उत्पादन आस्थापनांवर धडक कारवाई करत तब्बल १७ लाख ७९ हजार ५३८ रुपयांचा गुळ व साखरेचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुळ उत्पादन व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बोरी पारधी, सहजपूर, खामगाव फाटा व परिसरातील गुळ उत्पादन केंद्रांची तपासणी केली. यामध्ये प्रथमेश गुळ उद्योग (सहजपूर), सात्विक ऑर्गानिक गृह उद्योग (सहजपूर), साहिल मलिक (खामगाव फाटा) आणि सहादत डी. हुसेन (दौंड) यांच्या आस्थापनांचा समावेश होता.
तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गुळ उत्पादन प्रक्रिया अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू असल्याचे आढळून आले. काही उत्पादकांकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवाना नसल्याचेही निदर्शनास आले. तसेच ग्राहकांची दिशाभूल करणारी वेष्टणे वापरली जात असल्याचे आणि गुळ उत्पादनात भेसळ करण्याच्या उद्देशाने साखरेचा वापर होत असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले.
जनतेच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने संबंधित आस्थापनांतून १६.६५० टन गुळ आणि २० टन साखर असा एकूण १७.७९ लाख रुपयांचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारावकर, खेमा सोनकांबळे, लक्ष्मीकांत सावळे, संतोष सावंत, सायली टाव्हरे, स्वाती मस्के, आदित्य जोशी, सकत सुवंशा, डॉ. सदाशिव शिंदे, नम्रता मोहिते, स्नहल येणारे, प्रतीक जाधव, अक्षय शेळके, अभिजीत झोडगे आणि पूजा चव्हाण यांच्या पथकाने सहायक आयुक्त (अन्न) प्र. व. आबरे यांच्या उपस्थितीत पार पाडली. सह आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भेसळयुक्त, निकृष्ट किंवा बेकायदेशीर अन्न उत्पादनाबाबत माहिती असल्यास ती प्रशासनापर्यंत पोहोचवावी. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *