निर्वी येथे अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; निवेदनानंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू

निर्वी येथे अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; निवेदनानंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामे सुरू

नागरगाव (प्रतिनिधी – विजय कांबळे)

: शिरूर तालुक्यातील निर्वी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, जोरदार वारे व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी निर्वी गावच्या सरपंच भाग्यश्रीताई कमलेश शेठ बोराडे, माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे सुरू केले.
काल सायंकाळी पाचच्या सुमारास निर्वी परिसरात अचानक अवकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हरभरा, गहू, डाळिंब यांसह इतर पिके अक्षरशः भुईसपाट झाली. तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या कांद्याच्या रानात पाणी साचल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. निर्वी परिसर डाळिंब उत्पादनासाठी ओळखला जातो; मात्र या अवकाळी पावसामुळे डाळिंब पिकालाही मोठा फटका बसला आहे.
या नुकसानीची दखल घेत सरपंच भाग्यश्रीताई बोराडे, माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी निर्वी गावचे तलाठी हर्षद साबळे तसेच कृषी अधिकारी गदादे यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारताच तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली.
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी विशाल शेळके, प्रमोद राजगुरू यांच्यासह निर्वी येथील अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *