शिरूर तालुका : शिक्षण कार्य तपस्वी सन्मानाने गौरविले गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर

प्रतिनिधी- बालाजी कांबळे

शिरूर तालुका राज्यात शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सातत्याने अव्वल ठरत असून शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणून संपूर्ण राज्यात लौकिक मिळवला आहे. या उल्लेखनीय यशामागील प्रेरणास्थान ठरलेल्या शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर तर्फे शिक्षण कार्य तपस्वी सन्मान जाहीर झाला आहे.

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कळमकर यांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जाते. शालेय शिक्षण विभागामार्फत ते सातत्याने विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्याचे, शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे व शैक्षणिक उपक्रम राबवण्याचे काम करीत आहेत.

त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील विद्यार्थी लाभाच्या योजना, केंद्र व राज्य शासनाचे शैक्षणिक उपक्रम, नवभारत साक्षरता योजना यांचा प्रभावी रितीने लाभ घेत आहेत. शिक्षकांचे वेतन वेळेत मिळणे, तालुकास्तरीय प्रशासकीय अडचणींवर तत्काळ उपाय यांसारख्या बाबींमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतेच नव्हे, तर सामाजिक कार्यातही कळमकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मायेची ऊब फाउंडेशन, शिवदुर्ग प्रेमी प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रेकर्स यांसारख्या सामाजिक संस्थांबरोबर कार्यरत राहून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मदत केली आहे तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामात सहभाग नोंदवला आहे.

गटशिक्षणाधिकारी कळमकर यांच्या कार्यक्षम व न्यायप्रिय नेतृत्वाचा शिरूर तालुक्यातील शिक्षकांना अभिमान आहे. त्यांना मिळालेल्या शिक्षण कार्य तपस्वी सन्मानाबद्दल संपूर्ण शिक्षण विभागात आनंद व्यक्त होत आहे.

या सन्मानप्राप्तीबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब कारेकर, गटविकास अधिकारी महेश डोके यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे मानले जाते.

रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे संस्थापक वीरधवल करंजे, अध्यक्ष संजय तांबे, सचिव शिरीष हार्दे, संचालक मिलिंद भोसुरे, मयूर करंजे, लधाराम पटेल, विठ्ठल वाघ, संजीव मांढरे तसेच सन्मान सोहळा समन्वयक मनोहर परदेशी (माध्यमिक) व राहुल चातुर (प्राथमिक) यांनी कळमकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *