शिरूर-न्हावरा रोडवरील ‘न्यू सागर रेस्टॉरंट’मध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद — पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
शिरूर (जि. पुणे) : शिरूर ते न्हावरा रोडवरील ‘न्यू सागर रेस्टॉरंट अँड बार’मध्ये घरफोडी करून परदेशी दारू व बिअर बॉक्स चोरणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे तब्बल 61 हजार 820 रुपयांचा चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही घटना 27 जुलै रोजी घडली होती. अज्ञात आरोपीने रेस्टॉरंटचे शटर तोडून दारूच्या बाटल्या व बिअर बॉक्स असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी कुमार दिलीप जाधव (वय 23, रा. करडे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गु.र. नं. 548/2025 भा.दं.वि. कलम 334(1), 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता, पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार वापरल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे ही कार व संशयित आरोपी पुणे परिसरात असल्याचे समजले.
5 ऑगस्ट रोजी कामशेत परिसरातून तपास पथकाने ही इनोव्हा कार (MH 43 L 1600) हस्तगत केली. कारमधून दोन आरोपी — ताजुद्दीन दस्तगीर शेख (वय 25, रा. टाकळवाडे, ता. फलटण, जि. सातारा) व गारेखनाथ काहू उर्फ काळूराम जाधव (वय 34, रा. बोरखेडी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) — यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यासोबत सुनील दत्तू राऊत (रा. राऊतवाडी, कामशेत) हा देखील सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून ताब्यात घेतलेल्या आरोपींना शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपींवर यापूर्वीही रांजणगाव एमआयडीसी, सुपा पोलीस स्टेशन आदी ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर चोरीतील मुद्देमाल आरोपींनी कोणाला विकला अथवा त्याचे पुढे काय केले याबाबत शिरूर पोलीस तपास करत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 8 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे संदेश केंजळे आणि पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.




