कोळगाव डोळस येथे गायराण जमीन खनिज चोरीचा प्रकार – 94 हजारांची काळी माती लंपास…..

कोळगाव डोळस येथे गायराण जमीन खनिज चोरीचा प्रकार – 94 हजारांची काळी माती लंपास

शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथील गायराण जमिनीतून बेकायदेशीररीत्या काळी माती चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 26 जुलै 2025 च्या रात्रीपासून ते 27 जुलै सकाळपर्यंत अज्ञात चोरट्याने 58.5 ब्रास इतकी माती चोरून नेल्याची घटना घडली असून, या मातीची अंदाजे किंमत सुमारे 94,185 रुपये इतकी आहे.

या प्रकरणी हर्षद बाळासाहेब साबळे (वय 29), ग्राम महसूल अधिकारी यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी सध्या बाबुरावनगर, शिरूर येथे वास्तव्यास असून मूळ गाव पारगाव सुद्रीक, श्रीगोंदा (जि. अहमदनगर) आहे.

तक्रारीनुसार, मौजे कोळगाव डोळस येथील गट नं. 108 मधील गायराण जमिनीतून मातीची बेकायदेशीर उत्खनन करून ती अज्ञात व्यक्तींनी चोरी केली आहे. या प्रकारासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नव्हती. संशयित चोरट्यांनी शासनाची फसवणूक करत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही माती चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 303(2) सह, खाण व खनिज विकास व विनियमन अधिनियम 1957 चे कलम 4(अ) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9 व 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार 2971 गवळी करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून संदेश केंजळे कार्यरत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एन्ट्री नं. 62/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या चोरीमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून, शासकीय मालमत्तेवर सुरू असलेली बेकायदेशीर उत्खननाची प्रकरणे हायअलर्टवर तपासण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. घटनास्थळी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *