कुरकुंभ येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावले; दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
Rjnews27 मराठी – विकास साळुंके
दौंड : तालुक्यातील कुरकुंभ येथे सर्व्हिस रोडवर एका महिलेच्या गळ्यातील २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हर्षदा श्रीकांत जाधव (वय ३६, रा. पांढरेवाडी, मुकादमवाडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास मौजे कुरकुंभ येथील सगुना कंपनीजवळील सर्व्हिस रोडवर घडली.
फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन दोन अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना धक्का देत गळ्यातील मिनी गंठन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरट्यांनी २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे, २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन लंपास केले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.






