प्लॅस्टिकमुक्त पर्यावरणासाठी शिवसेनेकडून नागरिकांना ताडपत्री पिशव्यांचे वाटप

प्लॅस्टिकमुक्त पर्यावरणासाठी शिवसेनेकडून नागरिकांना ताडपत्री पिशव्यांचे वाटप

चंदननगरवडगावशेरी परिसरात एक हजार नागरिकांपर्यंत उपक्रम; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

Rjnews27 मराठी – 

पुणे : वाढत्या प्लॅस्टिक वापरामुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने चंदननगर आणि वडगावशेरी परिसरात नागरिकांना मोफत ताडपत्री पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना विधानसभा प्रमुख हेमंत बत्ते यांच्या पुढाकारातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.

 

दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

या उपक्रमांतर्गत चंदननगर व वडगावशेरी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, हास्यक्लबचे सदस्य, योगा ग्रुपमधील नागरिक तसेच विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना ताडपत्री पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे एक हजार नागरिकांना ताडपत्री पिशव्या देण्यात आल्या आहेत.

 

यावेळी नागरिकांनी दैनंदिन खरेदी आणि इतर कामांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कमी करून टिकाऊ आणि पुनर्वापर करता येणाऱ्या ताडपत्री पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन हेमंत बत्ते यांनी केले.

 

वाटप करण्यात आलेल्या पिशव्यांवर “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे”, “झाडे लावा”, “प्रदूषण टाळा”, “प्लॅस्टिक टाळा” आणि “निसर्ग वाचवा” असे सामाजिक व पर्यावरणविषयक संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या पिशव्यांच्या माध्यमातून केवळ प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध होत नसून नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही केली जात आहे.

 

प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नागरिकांनी आपल्या दैनंदिन सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढवून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून, भविष्यातही अशाच प्रकारचे पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights