एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकाची ३८ हजार रुपयांची फसवणूक
Rjnews 27 मराठी – बालाजी कांबळे
शिरूर : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करून अज्ञात व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून तब्बल ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शिरूर शहरात घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरसींग लक्ष्मण पाचर्णे (वय ६६, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) हे दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील बी.जे. कॉर्नरजवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
यावेळी एटीएममध्ये आधीपासून उपस्थित असलेल्या अंदाजे ३० ते ३२ वर्षे वयाच्या एका अनोळखी इसमाने पाचर्णे यांच्याशी संवाद साधत त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. “तुमचे पैसे कट झाले आहेत, तुम्ही एटीएमची स्लिप का घेतली नाही? थांबा, मी तुम्हाला स्लिप काढून देतो,” असे सांगून या इसमाने पाचर्णे यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले.
मदतीच्या बहाण्याने हातात घेतलेल्या एटीएम कार्डची आरोपीने चलाखीने अदलाबदल केली. त्यानंतर फिर्यादीच्या मूळ एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून ३८ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिरसींग पाचर्णे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार दि. ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत असून, एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी एटीएममधून व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींकडून मदत घेऊ नये तसेच आपले एटीएम कार्ड कोणाच्याही ताब्यात देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रकरणात दाखल अंमलदार म्हणून पोहवा/३९८ पवार यांनी काम पाहिले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.






