सरकारी दवाखान्यात जाते सांगून विवाहित महिला चार वर्षीय मुलासह बेपत्ता; शिरूर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल
शिरूर : प्रतिनिधी – बालाजी कांबळे
शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील देवाडेवस्ती परिसरातून एक विवाहित महिला आपल्या चार वर्षीय मुलासह घरातून बाहेर पडल्यानंतर परत न आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला शिरूर येथील सरकारी दवाखान्यात जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र, त्यानंतर ती आणि तिचा मुलगा दोघेही घरी परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने महिला व तिच्या मुलास फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून शिरूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दोघांचा कसून शोध घेत आहेत.
ही घटना मौजे रामलिंग येथील देवाडेवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे येथे घडली. फिर्यादी सागर मुरलीधर धुळे (वय 39), व्यवसाय मजुरी, यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी अनिता सागर धुळे (वय 29) या 6 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आपला चार वर्षीय मुलगा भिमा याला सोबत घेऊन घरातून बाहेर पडल्या.
घरातून निघताना त्यांनी शिरूर येथील सरकारी दवाखान्यात जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर बराच वेळ उलटल्यानंतरही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला, तसेच नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी केली. मात्र, महिला आणि तिच्या चार वर्षीय मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, अनिता धुळे आणि त्यांचा मुलगा भिमा यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता अनिता सागर धुळे यांचा रंग सावळा असून त्यांचा चेहरा गोलाकार आहे. त्यांचे केस लांब व काळे असून, नाक सरळ आणि शरीरयष्टी मध्यम आहे. त्यांची उंची अंदाजे 5 फूट 1 इंच आहे. घरातून बाहेर पडताना त्यांच्या कानात लाल रंगाची फुले, गळ्यात मणी मंगळसूत्र व देवाचा ताईत होता. त्यांनी पिवळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला होता, तर पायात लाल रंगाच्या सँडल होत्या. त्या मराठी भाषा बोलतात. त्यांच्यासोबत टेक्नो कंपनीचा मोबाईल फोन असून त्यामध्ये 9022837013 क्रमांकाचे सिमकार्ड असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
त्यांच्यासोबत असलेला चार वर्षीय भिमा सागर धुळे याचा रंग सावळा असून चेहरा उभट आहे. त्याचे केस काळे असून उंची अंदाजे 2 फूट 5 इंच आहे. घरातून बाहेर पडताना त्याने जांभळ्या रंगाचा फुल शर्ट आणि जांभळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती.
महिला आणि चिमुकल्याचा अद्याप शोध लागलेला नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. परिसरातील संभाव्य ठिकाणी चौकशी करण्यात येत असून, दोघांचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामागे नेमके काय कारण आहे आणि दोघे कुठे गेले, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे रामलिंग आणि देवाडेवस्ती परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर पोलीस ठाण्यात 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.






