मांडवगण फराटा येथे शेतजमिनीच्या वादातून ऊस पिकाचे नुकसान; तिघांविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा
Rjnews27 मराठी – बालाजी कांबळे
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावच्या हद्दीत शेतजमिनीच्या वादातून ऊस पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच शेतात काम करण्यास विरोध करून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संजय मांगीलाल बोरा (वय ५८, व्यवसाय शेती, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार शहाजी काशिनाथ सोनवणे, साधना महादेव सोनवणे आणि महादेव शहाजी सोनवणे, सर्व रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा गावच्या हद्दीतील गट क्रमांक ६४०/२ मधील शेतजमिनीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर मारून ऊस पिकाचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच शेतजमिनीचा बांध तोडून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर जमीन फिर्यादी यांच्या आईच्या मालकीची असून ती त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात व वहिवाटीत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर १ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी हे नुकसान झालेल्या ठिकाणी ऊसाचे पीक व कंपाऊंड पूर्ववत करण्यासाठी गेले असता, तेथे संबंधित तिघे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी शेतात काम करण्यास विरोध करून अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. तसेच या जमिनीशी तुमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगून काम करण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे.
यावेळी फिर्यादी यांनी महादेव सोनवणे याला ऊसाच्या शेतात रोटर का मारला, अशी विचारणा केली असता वाद वाढला. त्यानंतर महादेव सोनवणे आणि शहाजी सोनवणे यांनी हाताने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून स्टे डायरीमध्ये ६५/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक श्री. कदम करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हवालदार जगताप यांनी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शिरूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.




