दौंडमध्ये प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त; ५० हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

दौंडमध्ये प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त; ५० हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

Rjnews 27 मराठी – विकास साळुंके

दौंड : दौंड शहरातील सरपंचवस्ती परिसरात विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आलेला प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत विमल पान मसाला आणि व्ही-१ तंबाखूचा एकूण ५० हजार ६०२ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरपंचवस्ती परिसरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास सरपंचवस्ती येथील ओमसिद्धी सूरज अपार्टमेंटच्या डी विंगमधील फ्लॅट क्रमांक १४ येथे छापा टाकला.

 

या कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी पोलिसांना विविध प्रकारचा विमल पान मसाला तसेच व्ही-१ तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. चार पांढऱ्या गोण्यांमध्ये ठेवण्यात आलेला विमल पान मसाला, प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला पान मसाला तसेच व्ही-१ तंबाखूचे विविध पाउच असा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ५० हजार ६०२ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालाची पंचांसमक्ष नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक सपाटे यांनी पंचांच्या उपस्थितीत जप्त मालावर आवश्यक ती कागदी सील व लेबले लावून तो पोलिसांच्या ताब्यात घेतला. त्यामुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी करण्यात आलेल्या साठवणुकीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

 

या प्रकरणी शोएब लाडलेमशाक मुल्ला (वय २४) याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला २८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सरपंचवस्ती परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

या कारवाईत फिर्यादी म्हणून विशाल हरिश्चंद्र जावळे, पोलीस हवालदार, यवत पोलीस ठाणे तथा प्रतिनियुक्तीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड उपविभाग येथे कार्यरत असलेले अधिकारी सहभागी होते.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करीत आहेत. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणूक व विक्रीविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *