सात दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश; पहाटे ३.३८ वाजता इनामगावातील बिबट्या जेरबंद
Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे
नलगे वस्ती परिसरात वनविभागाचे सात दिवसांपासून ठाणे; प्रतीक्षेच्या काळात बिबट्याने तीन शेळ्या फस्त केल्या
इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील नलगे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल सात दिवस परिसरात ठाण मांडून पाळत ठेवली होती. या सात दिवसांच्या प्रतीक्षेच्या काळात बिबट्याने जवळपास तीन शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले होते.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाने परिसरात शिळे भक्ष ठेवून सापळा रचला होता. सात दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्षाच्या दिशेने आला आणि त्याने शेळीवर हल्ला केला. याच वेळी दबा धरून बसलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य संधी साधत बिबट्यावर भुलीचे इंजेक्शन झाडले.
काही वेळातच भुलीच्या इंजेक्शनचा परिणाम होऊन बिबट्या बेशुद्ध झाला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. पहाटे ३ वाजून ३८ मिनिटांनी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
सात दिवस रात्रंदिवस बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून अखेर त्याला पकडण्यात आल्याने नलगे वस्ती परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याच्या दहशतीमुळे पशुपालकांमध्ये निर्माण झालेली भीतीही आता कमी झाली असून, वनविभागाच्या या नियोजनबद्ध कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.




