आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकात विविध उपक्रमांनी क्रांती दिन उत्साहात साजरा; मशाल रॅलीतून क्रांतिकारकांना मानवंदना

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकात विविध उपक्रमांनी क्रांती दिन उत्साहात साजरा; मशाल रॅलीतून क्रांतिकारकांना मानवंदना

 

पुणे, दि. ९ ऑगस्ट : अल्लाउद्दीन अलवी, प्रतिनिधी

 

पुणे येथील मामलेदार कचेरी परिसरातील आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक उपक्रमांच्या माध्यमातून क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे स्मारक परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. इतिहासप्रेमी, विद्यार्थी, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतिकारकांना अभिवादन केले.

 

क्रांती दिनानिमित्त आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास मा. अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यात आली. स्मारक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

ऐतिहासिक काव्यवाचनातून क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा

 

क्रांती दिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्य मंचाच्या वतीने ऐतिहासिक काव्य वाचन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये ऐतिहासिक घटनांवर आधारित काव्यवाचनातून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या शौर्य, त्याग आणि संघर्षाला उजाळा देण्यात आला.

 

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास अभ्यासक संदीप तापकीर तसेच ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक शिवाजीराव शिर्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक व साहित्यिक संदर्भाची विशेष जोड मिळाली.

 

मशाल रॅलीतून क्रांतिकारकांना मानवंदना

 

सायंकाळी इतिहासप्रेमी मंडळ, पुणे यांच्या वतीने क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या मशाल रॅलीची सुरुवात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकापासून करण्यात आली. त्यानंतर रॅलीचा समारोप हुतात्मा नारायण दाभाडे स्मारक येथे करण्यात आला.

 

इतिहासप्रेमी मंडळी, इतिहासतज्ज्ञ प्रा. श्री. मोहन शेटे सर तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मशाल रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देण्यात आली.

 

विद्यार्थी व इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती

 

दिवसभर आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक परिसरात इतिहासप्रेमी, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी भेट देऊन क्रांतिकारकांना अभिवादन केले. क्रांतिकारकांच्या इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

 

क्रांती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे क्रांतिकारकांच्या त्यागाची आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवण नव्या पिढीसमोर जिवंत करण्याचा प्रयत्न झाला. स्मारक परिसरात दिवसभर देशभक्ती, इतिहास आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *