प्रतिनिधी -विजय कांबळे
नागरगाव, दि. ९ : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि क्रांतिवीर हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करत ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या देशभक्तीपर रॅलीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. बँड पथकाच्या तालावर, देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकाकडे मार्गक्रमण केले. स्मारकस्थळी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी हुतात्मा पिंगळे यांना मानवंदना देत त्यांच्या शौर्याला अभिवादन केले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, तसेच शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक श्री. महेशबापू ढमढेरे यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना महेशबापू ढमढेरे यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या देशभक्ती, त्याग आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. विष्णू गणेश पिंगळे हे गदर चळवळीशी संबंधित असून भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीची तयारी करणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक होते. त्यांनी परदेशात जाऊन भारतीय क्रांतिकारकांशी संपर्क साधला तसेच स्वातंत्र्यलढ्यासाठी संघटन आणि प्रचाराचे कार्य केले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करताना पिंगळे यांना १९१५ मध्ये ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यांच्यावर लाहोर कट प्रकरणात खटला चालवण्यात आला. अखेर १६ नोव्हेंबर १९१५ रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकाचे बलिदान आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे, असे महेशबापू ढमढेरे यांनी सांगितले.
“हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे महाराष्ट्राच्या क्रांतिकारी परंपरेतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. अशा थोर क्रांतिकारकांची आठवण जपणे आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. मोहन ओमासे तसेच सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र भुजबळ यांनीही हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या कार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि देशभक्तीची प्रेरणा दिली.
कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे, उपप्राचार्य सुनीता पिंगळे, ग्राम विस्तार अधिकारी चेतन वाव्हळ, तळेगावच्या रोहिणी तोडकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ, उद्योजक सोमनाथ ढमढेरे यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना गोरे यांनी केले, तर आभार नंदा सातपुते यांनी मानले. क्रांतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव निर्माण झाली.




