माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता; कळसकरवाडी जिल्हा परिषद शाळेला २५ हजारांचा आधुनिक प्रिंटर, तर १० हजारांची वायरलेस साऊंड सिस्टिम भेट

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

कळसकरवाडी, ता. शिरूर : ज्या शाळेने विद्यार्थ्यांच्या जीवनाची पायाभरणी करून त्यांना ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदर्श उपक्रम कळसकरवाडी येथे पाहायला मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसकरवाडीच्या शैक्षणिक व भौतिक गरजा लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आधुनिक शैक्षणिक साधनांची भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

शाळेचे माजी विद्यार्थी श्री. समीर कळसकर यांनी आपली पुतणी कुमारी इशिका किरण कळसकर हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा एच.पी. कंपनीचा आधुनिक वायरलेस कनेक्टेड प्रिंटर शाळेला भेट दिला. शाळेतील दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी प्रिंटरची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली.

दरम्यान, शाळेच्या गरजा ओळखून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष किरण कळसकर यांनी शाळेचे मुख्याध्यापक मोहन आनोसे यांच्याशी चर्चा केली. शाळेसाठी चांगल्या प्रतीचा प्रिंटर आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब किरण कळसकर यांनी आपले बंधू समीर कळसकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत प्रिंटर देण्याचा निर्णय घेतला.

याचबरोबर टॉपर्स ॲकॅडमीचे प्राध्यापक लक्ष्मण कळसकर यांनीही आपली मुलगी श्रावणी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे १० हजार रुपये किमतीची ब्लूटूथ कनेक्टेड वायरलेस साऊंड सिस्टिम शाळेला भेट दिली. त्यामुळे शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रार्थना, वक्तृत्व, क्रीडा व इतर उपक्रमांसाठी आधुनिक ध्वनिव्यवस्थेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

वाढदिवसाला सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची जोड

कळसकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून उत्साहात साजरे केले जातात. मात्र, केवळ वाढदिवसाचा आनंद साजरा न करता त्याला शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची जोड देण्याचा सकारात्मक उपक्रम येथे राबविला जात आहे.

पालकांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मिठाई, बिस्किटे, चॉकलेट तसेच केळीचे वाटप केले जाते. त्याचबरोबर शाळेच्या भौतिक सुविधा आणि आवश्यक शैक्षणिक साधनांची गरज काय आहे, याबाबत शिक्षकांशी चर्चा करून त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, दातृत्व, कृतज्ञता आणि शिक्षणाबद्दलची सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होत आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी पुढाकार घेणे हे इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

माजी विद्यार्थ्यांचे योगदान शाळेच्या विकासासाठी महत्त्वाचे

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. कळसकरवाडी शाळेतील या उपक्रमातून माजी विद्यार्थी आपल्या शाळेशी असलेले नाते जपत असून, ‘ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेसाठी आपणही काहीतरी देणे लागतो’ ही भावना प्रत्यक्ष कृतीतून दिसून आली.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कळसकर, उपाध्यक्षा संध्याताई कळसकर, मुख्याध्यापक मोहन आनोसे, उपशिक्षिका मीनाक्षी आनोसे, व्यवस्थापन समिती सदस्य किरण कळसकर, जयदीप चौधरी तसेच परिसरातील ग्रामस्थ रामदास कळसकर, यशवंत कळसकर, सनी कळसकर, रेखाताई कळसकर, कल्याणी कळसकर, विद्या कळसकर, अश्विनी खोरे मॅडम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

“शाळेने आपल्याला घडविले, स्वतःच्या पायावर उभे केले. त्यामुळे माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या गरजा ओळखून तिच्या विकासात आपला हातभार लागावा, हीच भावना आहे,” अशी भावना या उपक्रमामागे असल्याचे सांगण्यात आले.

कळसकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा उपक्रम ‘वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शिक्षणासाठी योगदान देण्याचा’ आदर्श निर्माण करणारा असून, ग्रामीण शाळांच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

– मोहन आनोसे, मुख्याध्यापक

जि. प. प्राथमिक शाळा, कळसकरवाडी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *