शिरूर, प्रतिनिधी : राम कांबळे
शिरूर तालुक्यातील तांदळी येथील कार्यक्षम माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांना जलसंवर्धन व भूमी सुधारणा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने ‘जलमित्र पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील समितीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
राजेंद्र गदादे यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तांदळी परिसरातील सुमारे दोन हजार एकर क्षारपड जमीन सुधारणा करून ती लागवडीखाली आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन उपलब्ध झाली असून परिसरातील शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. जलव्यवस्थापन, भूमी संवर्धन आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
गदादे यांच्या या कार्याची दखल घेत बाबुराव दौंडकर स्मारक समितीने त्यांना यंदाचा ‘जलमित्र पुरस्कार’ जाहीर केला आहे. त्यांच्या निवडीमुळे तांदळीसह शिरूर तालुक्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, बाबुराव दौंडकर स्मारक समिती गेल्या २९ वर्षांपासून शिरूर तालुक्यात भूमी संवर्धन, जल व्यवस्थापन, कृषी विकास, शिक्षण, गोसंवर्धन तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबवत आहे. ग्रामीण विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करून समाजात प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देण्याची परंपरा समितीने सातत्याने जपली आहे.
यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली




