आरोग्य, पर्यावरण आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम; भिगवण सायकल क्लबची ११५ किमी पंढरपूर सायकल वारी ६ तासांत यशस्वी

भिगवण प्रतिनिधी : राजेंद्र शिंदे

आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा संदेश देत भिगवण सायकल क्लबने यंदाची पंढरपूर सायकल वारी उत्साहात पूर्ण केली. भिगवण ते पंढरपूर हा ११५ किलोमीटरचा प्रवास सायकलपटूंनी अवघ्या सहा तासांत पूर्ण करत शारीरिक तंदुरुस्ती, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला. क्लबच्या या वार्षिक सायकल वारीचे हे सलग नववे वर्ष असून, ‘सायकल चालवा, तंदुरुस्त रहा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

पहाटे दोन वाजता भिगवण येथून वारीला सुरुवात झाली. भिगवण–इंदापूर–अकलूज या पालखी मार्गाने प्रवास करत सकाळी दहा वाजता सर्व सायकलपटू सुखरूप पंढरपूर येथे पोहोचले. संपूर्ण प्रवासात सहभागींचा उत्साह आणि शिस्त विशेष लक्षवेधी ठरली.

या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे वयोगटाची कोणतीही अट नसताना लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अवघ्या ११ वर्षांचा सार्थक चव्हाण याने आपल्या जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर ६८ वर्षीय सेवानिवृत्त मेजर भांडवलकर यांनीही संपूर्ण प्रवास पूर्ण करून तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

भिगवण सायकल क्लबचे सदस्य वर्षभर विविध सायकल मोहिमा आणि राईड्समध्ये सक्रिय असतात. अनेक सदस्यांना १०० ते २०० किलोमीटर सायकल चालविण्याचा अनुभव आहे. नियमित व्यायाम, उत्तम आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि समाजात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे क्लबच्या सदस्यांनी सांगितले.

संपूर्ण प्रवासादरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पवार यांनी बॅकअप वाहनाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच क्लबचे माजी अध्यक्ष संपत बंडगर, अल्ताफ शेख, नामदेव कुदळे आणि साहिल मुलानी यांनी उपस्थित राहून सायकलपटूंना प्रोत्साहन दिले.

या यशस्वी सायकल वारीत अर्जुन तोडेकर, केशव भापकर, संतोष सवाने, विजयकुमार हंगे, श्याम सातार्ले, औदुंबर हुलगे, योगेश चव्हाण, डॉ. भारत भरणे, कुलदीपक ननवरे, डॉ. अमित खानावरे, अथर्व दाताळ आणि डॉ. संकेत मोरे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ, निखिल बोगावत आणि रियाज शेख यांनी सर्व सायकलपटूंचे जंगी स्वागत करून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे अभिनंदन केले. भिगवण सायकल क्लबच्या या उपक्रमामुळे परिसरात आरोग्य, पर्यावरण आणि सायकल संस्कृतीबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून, क्लबच्या सदस्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *