आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजस सोसायटीत योगसाधनेचा उत्साह; योग प्रशिक्षकांचा सन्मान

प्रतिनिधी : शाम जगताप

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कात्रज येथील राजस सहकारी गृहरचना संस्था परिसरात योग दिन मोठ्या उत्साहात आणि आरोग्यदायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सोसायटीतील सभासदांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाभ्यासाचे महत्त्व जाणून घेतले.

कार्यक्रमादरम्यान विविध योगासनांचे प्रात्यक्षिक, सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच सूक्ष्म व्यायाम यांचे मार्गदर्शन करण्यात आले. सौ. मीनाक्षी सं. खोपडे (मीनाक्षी योगा ग्रुप, कात्रज), सौ. श्रद्धा श्रीराम कुलकर्णी (स्वास्थ्य वर्ग, सुखसागरनगर) आणि सौ. शुभदा नितीन तांबोळकर यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. तसेच नियमित योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन, चांगले आरोग्य आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने योग प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. राजस सोसायटीचे अध्यक्ष हेमंत धायबर, सचिव दुष्यंत घाटगे, नगरसेवक प्रतिक कदम, दैनिक सकाळचे पत्रकार अशोक गव्हाणे, सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव संजय कारंडे, खजिनदार चंद्रशेखर कोरडे, पत्रकार कांताभाऊ राठोड तसेच पर्वती नागरी समितीचे कार्याध्यक्ष तानाजी शिरोळे यांच्या हस्ते योग प्रशिक्षकांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा आधार असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमामुळे सोसायटी परिसरात आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी राजस सोसायटी व सुखकर्ता सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष हेमंत धायबर यांनी सर्व मान्यवर, प्रशिक्षक आणि उपस्थित सभासदांचे आभार मानले. योग दिनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *