प्रतिनिधी – विकास साळुंके
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) तपासाचा वेग वाढवत आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २७ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमित बाजीराव टेंगले (वय २७, रा. बोरी पारधी, ता. दौंड) आणि सचिन विश्वनाथ कदम (वय ४३, रा. बोरी पारधी, ता. दौंड) यांचा समावेश आहे. तपासादरम्यान या दोघांची भूमिका केवळ सहाय्यक नसून संपूर्ण रॅकेटच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित टेंगले हा मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्याकडे चालक म्हणून कार्यरत होता. मात्र या भूमिकेच्या पलीकडे जाऊन तो प्रत्यक्षात गर्भलिंग निदानासाठी महिलांची व्यवस्था करणे, त्यांना विविध ठिकाणी नेणे आणि या बेकायदेशीर प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अशी कामे करत होता. या माध्यमातून त्याला कमिशन स्वरूपात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशय टाळण्यासाठी ही रक्कम त्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
तसेच बेकायदेशीर गर्भपातानंतर अर्भकांची विल्हेवाट लावून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यामध्येही त्याचा सहभाग असल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले आहे. ही बाब प्रकरणाच्या गांभीर्यात अधिक भर घालणारी ठरत आहे.
दुसरा आरोपी सचिन कदम हा या रॅकेटमध्ये एजंट म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो गर्भलिंग निदानासाठी गरोदर महिलांना आणून देण्याचे काम करत होता. याशिवाय या बेकायदेशीर व्यवसायातून मिळणाऱ्या रकमेचे विविध बँका, पतसंस्था आणि आर्थिक माध्यमांद्वारे व्यवस्थापन करून त्याचे कायदेशीर व्यवहारांमध्ये रूपांतर करण्याचे काम तो करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने तपास अधिक सखोल करण्यात येत आहे.
विशेष तपास पथकाकडून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर एजंट, मध्यस्थ तसेच संभाव्य वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत किती महिलांना गर्भलिंग निदानासाठी प्रवृत्त करण्यात आले, किती बेकायदेशीर गर्भपात घडवून आणण्यात आले आणि या माध्यमातून मिळालेला निधी नेमका कुठे व कसा वापरण्यात आला, याचा सर्वंकष तपास केला जात आहे.
तपासादरम्यान विविध बँक खात्यांतील व्यवहार, पतसंस्थांमधील गुंतवणूक आणि संबंधित आर्थिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत असून, मुख्य तपास अधिकारी संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात सहभागी असलेल्या अथवा आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गर्भलिंग निदानासाठी महिलांची व्यवस्था करणे, आर्थिक व्यवहार लपवणे, पुरावे नष्ट करण्यास मदत करणे किंवा आरोपींना आश्रय देणे यापैकी कोणताही सहभाग आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्त्री-भ्रूणहत्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




