संपादक – रमेश बनसोडे
शिरूर : तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरासह पिंपरी दुमाला भागात अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र (डीपी) चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकारामुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
रोहित्र चोरीला गेल्याने शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद पडला असून पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, उभ्या पिकांच्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांविरोधात पिंपरी दुमाला येथील शेतकरी कैलास खेडकर यांनी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधले. सतत होणाऱ्या डीपी चोरीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा आणि मानसिक ताण सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
वाघाळे, सोनेसांगवी, खंडाळे व आसपासच्या गावांमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, तसेच भविष्यात अशा चोरींवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
या वेळी रविंद्र खेडकर, ऋषिकेश नरवडे, नाना नरवडे, राजेंद्र खेडकर, शरद नरवडे, हिरामण खेडकर, संपत नरवडे, भाऊसाहेब टेमगिरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.




