निमोणे येथे प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पावर ग्रामस्थांचा आक्षेप; प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी

 

Rjnews27marathi – रमेश बनसोडे 

शिरूर तालुक्यातील निमोणे येथे प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. आज निमोणे ग्रामस्थांच्या वतीने तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मा. तहसीलदार, शिरूर, पोलीस निरीक्षक तसेच भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भातील विविध शंका, आक्षेप आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर, उपजीविकेवर आणि पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यावर ग्रामस्थांनी विशेष भर दिला. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांच्या भावना, सूचना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, संबंधित क्षेत्रातील गायरान जमिनीची अचूक हद्द निश्चित होईपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया तात्काळ स्थगित ठेवाव्यात, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या मुद्द्यावर प्रशासनाने स्पष्टता देऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनिल पवार, योगेश पाटील, ॲड. संदीप शिंदे, संतोष काळे, पंकज काळे आणि आनंदराव ढोरजकर आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी एकमुखाने आपले हक्क अबाधित राखण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा इशाराही दिला.

दरम्यान, प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. निमोणे येथील या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *