प्रतिनिधी – अंकुश घारे
*शिक्रापूर ग्रामसभेच्या ठरावाला डावलून स्मार्ट मीटर बसविण्याचा आरोप; काम तातडीने थांबविण्याची नागरिकांची मागणी*
शिक्रापूर (प्रतिनिधी): शिक्रापूर ग्रामसभेने स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध दर्शवून ठराव मंजूर केलेला असतानाही गावात आणि परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत “शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप”च्या वतीने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देत काम तातडीने थांबविण्याची तसेच संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या शिक्रापूर ग्रामसभेत गावात स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. ग्रामसभेचा ठराव अस्तित्वात असतानाही कोणतीही सविस्तर जनजागृती, खुली चर्चा किंवा नागरिकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवेदनामध्ये नागरिकांनी महावितरणकडे स्मार्ट मीटर योजनेबाबत शासन आदेश, परिपत्रके, मंजुरी, कायदेशीर आधार, ग्राहकांची संमती, कार्यपद्धती आणि स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीची माहिती मागितली आहे. तसेच शिक्रापूर ग्रामसभेच्या ठरावाची दखल घेण्यात आली आहे का, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये वाढ होणार का, रिचार्ज पद्धती लागू होणार का, ग्राहकांचे अधिकार काय असतील, तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास जबाबदारी कोणाची असेल याबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे न देता थेट अंमलबजावणी करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यावेळी ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाने ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर करावा, नागरिकांशी संवाद साधावा आणि सर्व संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी केली. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी खुली लोकसंवाद बैठक आयोजित करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जोपर्यंत शासन, महावितरण व संबंधित यंत्रणेकडून स्पष्ट माहिती दिली जात नाही आणि ग्रामसभेच्या ठरावाबाबत भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत शिक्रापूर गाव व परिसरातील स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने स्थगित करण्यात यावे, अशी ठाम भूमिका “शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप”ने घेतली आहे.
दरम्यान, या निवेदनाची प्रत संबंधित प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनालाही देण्यात आली असून पुढील काळात नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून सतीश सासवडे ,तुषार आळंदीकर, अक्षय मांढरे, स्वप्नील मांढरे, अतुल थोरवे ,गणेश अर्जुनराव सासवडे ,दिनेश मांढरे ,आकाश वाघोले यांनी महावितरण कार्यालय, शिक्रापूरचे महावितरण चे सहाय्यक अभियंत्यांना सोमनाथ कवितके यांना स्मार्ट मीटर संदर्भातील निवेदन दिले




