प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड तालुक्यातील चौफुला परिसरात गावठी पिस्टलचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या दोन जणांना यवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रेणुका कलाकेंद्रात घडलेल्या या प्रकारात मयूर दत्तू पाटील (वय २६) आणि पवन कल्लू बर्मी (वय २१, दोघेही रा. पिंपळवाडी रोड, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी बेकायदेशीर गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगून सोमनाथ छगन माने (वय ३०, रा. हडपसर, पुणे) यांना धमकावले. शिवीगाळ आणि दमदाटी करत त्यांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज आणि त्यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे दोन्ही आरोपींना केवळ दोन तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले.
अटकेदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यवत पोलीस हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत आहेत.




