वरवंड (प्रतिनिधी): विकास साळुंके
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, त्याच अनुषंगाने विभागीय आयुक्त शीतल तेली आणि पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी वरवंड येथे प्रत्यक्ष भेट देत पालखी मार्ग व विविध सुविधांची पाहणी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे. पाहणी दौऱ्यात पालखी मार्गाची स्थिती, रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, तात्पुरते निवारा केंद्र, शौचालये तसेच वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पालखी मार्गावर असलेल्या अडथळ्यांचे तातडीने निराकरण करून वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले.
आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा सोहळा असल्याने प्रशासनाकडून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. वरवंड परिसरात होणाऱ्या पालखी मुक्काम आणि मार्गावरील व्यवस्थेबाबत प्रशासन सतर्क असून, लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस, ग्रामविकास, जिल्हा परिषद तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.




